सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पार्टीने राजकारण करीत मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा डाव साधला. सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यादृष्टीने तपासाला सुरुवात केली.
मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या का केली. आत्महत्येस प्रवृत्त कोणी केले का याचा तपास करण्यात येत होता. सुशांतच्या आत्महत्येचे धागेदोरे जुळविण्याचे काम योग्यरितीने सुरू होते. तोपर्यंत सुशांतच्या वडिलांनीही कोणतीही तक्रार केलेली नव्हती. पण सुशांतच्या निधनानंतर काही कलाकारांनी शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली. तसेच मरणापूर्वी झालेल्या पार्टीमध्ये काय घडले तसेच त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यावरही संशय व्यक्त केला जाऊ लागला. सुशांतच्या मृत्यूनंतर 54 दिवस नंतरही मुंबई पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नाही. त्यामुळे सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिस ठाण्यात सुशांतच्या खात्यावरील 15 कोटी रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबियांनी काढले. तसेच त्यास मानसीक त्रास दिल्याचा आरोप केला व सीबीआय तपासाची मागणी केली. त्यानंतर सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला. दरम्यान राज्यातील भाजप नेत्यांनी मुंबई पोलिस कुणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मुंबई पोलिस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्या निलंबनाचीही मागणी केली. पण दोन दिवसांपूर्वी भारतीय आर्युविज्ञान संस्था (एम्स)ने सुशांतची हत्या नसून आत्महत्याच आहे. त्याच्या शरीरात विष आढळून आले नाही. त्यामुळे ती आत्महत्याच असल्याचा अहवाल सीबीआयला दिला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्यरितीने असून त्यांनी कोणालाही पाठिशी घालण्याचा किंवा वाचविण्याचा प्रयत्न केलेला नाही हे उघड झाले. पण जगात दोन नंबरवर असलेल्या मुंबई पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न झाला तो लाजिरवाणा होता. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सर्व कागदपत्रे देत तपासाला मदत केली होती. त्यामुळे आता भाजपासह त्याच्या हो मध्ये हो मिळवणारे सिने कलाकार व अन्य क्षेत्रातील मंडळी चांगलीच तोंडघशी पडली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एम्सच्या अहवालानंतर भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर भाजपाची मंडळी सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपाबाबत आता सारवा सारव करत आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनीही रविवारी पत्रकारांशी बोलताना आम्ही योग्यरितीनेच तपास करीत होतो, असे स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई पोलसांचा सुशांतच्या प्रकरणात विजय झाला असून आरोप करणारे तोंडघशी पडले आहेत.